प्रत्येक वर्षी अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू होतो आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पकडल्यानंतर, आयुक्त माझे मित्र असल्याचे कर्तव्यावरील पोलिसांना सांगून थेट मला फोन लावतात. पण, मी त्यांना दंड भरण्यास सांगतो. आपल्याला वाहतुकीबाबत जनजागृती करून नियम तोडणाऱ्यांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केले.
पुणे प्रादेशिक परिवहन विभाग, शहर, ग्रामीण आणि महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले, त्या वेळी पोळ बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी विकास देशमुख, महापौर चंचला कोद्रे, आमदार मोहन जोशी, अॅड. जयदेव गायकवाड, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, बाबा शिंदे, वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे आदी उपस्थित होते.
पोळ म्हणाले की, प्रत्येक वर्षी देशात एक लाख ४० हजार लोक अपघातामध्ये मरतात. राज्यातही अपघातातील मृत्यूचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे अपघात गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. शहरात वाहनांची संख्या वाढत आहे, मात्र, रस्त्यांची संख्या तीच आहे. शहर वाहतूक शाखेने केलेल्या कामामुळे २०१३ मध्ये अपघातांची संख्या घटली आहे. देशमुख म्हणाले की, रस्ता सुरक्षाचे काम या सप्ताहापुरतेच न राहाता वर्षभर करावे. पुणे जिल्ह्य़ातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमाबाबत जाणीव जागृती करणे गरजेचे आहे. या वेळी महापौर कोद्रे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा