‘ड्रम्स’पासून ‘घटम्’पर्यंतच्या वेगवेगळ्या वाद्यांचे ताल एकत्र आले आणि या तालांच्या साथीने पांढऱ्या कागदावर विविधरंगी अक्षरांनीही देखणी वळणे घेतली! निमित्त होते ‘कॅलिफेस्ट’ या सुलेखन महोत्सवाच्या उद्घाटनाचे.
सुलेखनकार पालव यांच्या हातून कुंचला, रंगाची टय़ूब, पेन अशा विविध माध्यमातून कागदावर झरझर उमटणारी अक्षरे आणि जोडीला अभिषेक तेंडुलकर यांच्या वादक चमूने केलेले ड्रम्स, तबला, डफ, चौघडा, घटम् अशा वाद्यांचे बहारदार वादन या जुगलबंदीला रसिकांनी भरभरून दाद दिली.
स्वयंभू फाउंडेशन आणि अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्यातर्फे या सात दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जपानचे सुलेखनकार ज्योती नाओकी इरी, ज्येष्ठ कलाकार प्रा. मुकुंद गोखले, पुणे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ शिरोळे, सुलेखनकार चित्रा मेटे, महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बिडकर या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले,‘आता मुलांच्या हाती लहानपणीच लॅपटॉप व स्मार्टफोन येत असल्यामुळे अक्षरे केवळ टाईप करण्यापुरती उरतील. त्यामुळे मुलांमध्ये सुलेखनाची संस्कृती रुजवायला हवी. सुलेखन हे कौशल्य विकसन व उद्योजकतेच्या स्वरुपात आणल्यास तरुणांना त्यातून रोजगारही प्राप्त होऊ शकेल.’
सुलेखन ही कला व शास्त्र दोन्ही असून माझ्यासाठी तेच अध्यात्मही आहे, असे ज्योती इरी यांनी सांगितले. ते म्हणाले,‘सुलेखन करताना आपण अक्षरातून संवाद साधतोच, पण आपला स्वत:शीही अंतर्गत संवाद होत असतो. स्वत:त बदल घडवण्याची ती संधी असते. कुंचल्यात बंदुकीपेक्षा अधिक ताकद असते असे म्हटले जाते. त्यामुळे या कुंचल्याच्या माध्यमातून विचार व पर्यायाने जग बदलता येऊ शकेल.’
७ डिसेंबपर्यंत हा महोत्सव घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक केंद्र येथे चालणार असून तो विनामूल्य आहे. विविध लिप्यांचा वेगवेगळ्या प्रकारच्या सुलेखनातून झालेला आविष्कार या वेळी पाहता येईल. तसेच, सुलेखनविषयक कार्यशाळाही महोत्सवात होतील.

Story img Loader