सातारा रस्त्यावर चव्हाणनगर कमान ते भारती विद्यापीठाजवळील पादचारी पुलापर्यंत बांधण्यात आलेल्या पुलाच्या अंतिम टप्प्यातील कामांची पाहणी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी केली. या पुलाचे उद्घाटन शनिवारी (२५ जुलै) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार असून सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी या पुलामुळे कमी होणार आहे.
धनकवडी येथे बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल शहरातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाला श्री शंकरमहाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. पुलाची लांबी १,२९६ मीटर असून रुंदी १५.८० मीटर आहे. पुलाच्या जोडरस्त्यांचे डांबरीकरण, पुलाखालील बीआरटी मार्गावर बसथांबे उभारणे, वाहनचालकांसाठी सूचनाफलक लावणे, रंगकाम आदी कामे सध्या सुरू आहेत. नगरसेवक विशाल तांबे, अप्पा रेणुसे तसेच श्रीनिवास बोनाला, सुरेश जगताप, विजय दहिभाते आदी महापालिकेचे अधिकारी या पाहणीच्या वेळी उपस्थित होते.
या पुलाखालून बीआरटी गाडय़ांसाठी दोन स्वतंत्र मार्ग उपलब्ध राहणार असून त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. तसेच बीआरटी गाडय़ांनाही प्रवासासाठी कमी वेळ लागणार आहे. या पुलाचा वापर करणाऱ्या वाहनांना चव्हाणनगर ते भारती विद्यापीठ दरम्यानचे तीन सिग्नल लागणार नाहीत. त्यामुळे वेळेची बचत होईल तसेच सातारा रस्त्यावरील वाहतुकीचा ताणही कमी होईल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी पाच वाजता या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून के.के. मार्केट येथे या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
धनकवडीतील उड्डाणपुलाचे शनिवारी उद्घाटन
धनकवडी येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन शनिवारी (२५ जुलै) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार अाहे.
First published on: 22-07-2015 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of dhankawadi overbridge on saturday