लहानपणापासूनचा कौटुंबिक प्रवास, पिंपरीत १९६८ मध्ये मुकादम म्हणून केलेले काम, पुढचा नट होण्यापर्यंतचा प्रवास, नटाची व्यथा व भूमिकांची सुखदु:खे, बदललेली सामाजिक व आर्थिक परिस्थिती, छपराच्या घरातून चौरस फुटांच्या घरात गेलेला माणूस व त्यातून हरवलेली माणुसकी, जाती-धर्माचे राजकारण, अशा विविध विषयांवर परखड भाष्य करणारे नाना पाटेकर हसता, हसवताना भावूक झाले. शेतकऱ्यांचे दु:ख मांडताना शेतकरी हा राजाच राहिला पाहिजे अशी भावना तळमळीने व्यक्त करून शेतकऱ्यांना भरभरून मदतीचा हात देणाऱ्यांविषयी त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.
पिंपरी महापालिकेच्या सहकार्याने होणाऱ्या विस्तारित ‘पिफ’चे उद्घाटन नानांच्या हस्ते झाले, त्यानंतर विविध विषयांवर त्यांनी तासभर मुक्तचिंतन केले. विविध अनुभव सांगताना आणि काही बाबींवर भाष्य करताना ते म्हणाले की, िपपरीत लिमये यांच्याकडे वर्षभर काम केले, मुकादम म्हणून पगार वाटले. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवले, कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसायचे, त्या वेळी अनेकांनी मदत केली. व्यवसाय चित्रकाराचा होता आणि नट बनणे हा छंद होता. आता उलटे झाले आहे. बराच संघर्ष करून चित्रपटसृष्टीत आलो, स्थिरावलो, आता कुठे काहीतरी गवसते आहे. नटाला वैयक्तिक आयुष्य नसते. भूमिकांची सुख:दुखे जगावी लागतात. प्रेक्षक नाकारू लागतात, तेव्हाच स्वत:साठी वेळ मिळतो. ‘नटसम्राट’नंतर रिता झालो आहे, आता काही करावेसे वाटत नाही. शहरे बदलली, ‘स्मार्ट’ होऊ लागली. मात्र सुविधा व सुखातील फरक ओळखून सुविधेपलीकडेचे शोधले पाहिजे.
शेतकरी हा राजाच राहिला पाहिजे. कोणत्याही सरकारला दोष द्यायचा नाही. मागितला नसताना सातवा आयोग मिळू शकतो. कधी काळी सहाशे रुपये असलेला पगार दोन लाखापलीकडे जातो. शेतकऱ्यांचे तसे नाही. उत्पादनाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांच्या विधवा पाहिल्यानंतर अस्वस्थ झालो होतो. त्यातून ‘नाम’चे काम सुरू झाले. त्या कुटुंबीयांसाठी आपण सगळे काहीतरी करू शकतो. ‘नाम’ला वीस कोटी जमा झाले; अगदी भिकाऱ्यानेही पैसे दिले. हे न संपणारे काम आहे. त्यासाठी तुम्ही भरभरून दिले. कुणाकडे मागायची वेळ आली नाही.

Story img Loader