‘लाकूड, तेल, अणुऊर्जा आणि हरित ऊर्जा ही जशी इंधने आहेत तसा ऊर्जेचा कार्यक्षम वापर हे देखील एक इंधनच आहे! कार्यक्षम वापराद्वारे ऊर्जाबचतीचे तंत्र अवलंबणे हा ‘ऊर्जानिर्मिती’ करण्याचा सर्वात कमी खर्चिक मार्ग आहे,’ असे मत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले.
‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’तर्फे (सीआयआय) आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रीनको समीट २०१३’चे कलाम यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. सीआयआयचे माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव, इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचे (आयजीबीसी) अध्यक्ष डॉ. प्रेम जैन, ‘सीआयआय- गोदरेज जीबीसी’चे अध्यक्ष जमशेद गोदरेज, सीआयआयच्या पुणे विभागाचे अध्यक्ष राजीव भिडे या वेळी उपस्थित होते.
कलाम म्हणाले, ‘‘इतर विकसनशील देशांप्रमाणेच भारतातही ऊर्जेच्या कार्यक्षम वापराला भरपूर वाव आहे. अनेक राज्यात ऊर्जेच्या वितरणात होणारा तोटा चाळीस टक्क्य़ांच्याही वर जातो. घरात अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ऊर्जेपासून ‘स्मार्ट’ बांधकामांपर्यंत ऊर्जेचा योग्य वापर करणे शक्य आहे. यामुळे आपण पन्नास टक्के ऊर्जेची बचत करू शकू.’’
हरित इमारत तंत्राचा वापर करणाऱ्या कंपन्यांना तसेच हरित बांधकाम प्रकल्पांना या वेळी कलाम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट, आयटीसी (भद्राचलम), वासवदत्ता सिमेंट (सेडाम), एसीसी (थोंडेभावी सिमेंट वर्क्स), ब्रेक्स इंडिया (शोलिंघर), जे.के. टायर अँड इंडस्ट्रीज (कंक्रोली), एचआयएल (गोलान), थायसेनक्रप इलेक्ट्रिकल स्टील इंडिया (नाशिक), हिंदुस्थान युनिलिव्हर (म्हैसूर) या कंपन्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा