महापौरांसमोरच घेतलेली आमदार विलास लांडे यांची फिरकी, स्वपक्षीय नगरसेवकांना खडेबोल, अधिकाऱ्यांना कानपिचक्या देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पिंपरीत चौफेर फटकेबाजी केली. नाशिकफाटय़ाच्या उड्डाणपुलाला भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांचे नाव देण्याची सूचना करत महापौरपदी मोहिनी लांडे कायम राहतील, असे त्यांनी सूचित केले. विकासकामांचा वेग वाढवा, पुढील २५ वर्षांचे नियोजन करून काम करा आणि देशात ‘बेस्ट सिटी’ ठरलेल्या पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवा, असे आवाहन त्यांनी केले.
पिंपरी पालिकेच्या ‘सारथी’ माहितीपुस्तिका व हेल्पलाईनचे (८८८८००६६६६) उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या. आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, शहराध्यक्ष योगेश बहल, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे आदी उपस्थित होते. शहरविकासाचा, रखडलेल्या कामांचा व नियोजित प्रकल्पांचा आढावा अजितदादांनी तासाभराच्या भाषणात घेतला. त्यांचे भाषण सुरू असताना मध्ये-मध्ये सूचना करणाऱ्या लांडेंची अजितदादांनी नेहमीप्रमाणे फिरकी घेतली. विलासला लहानपणी बाटलीचे बूच चोखायची सवय असावी, अशी सुरुवात करत विलास लांडे यांचे नाव भोसरीच्या चौकाला नाही दिले तर पिंडाला कावळा शिवणार नाही, असा कळस त्यांनी केला. काही नगरसेवक उशिरापर्यंत जागतात, सूर्य डोक्यावर आल्यावर उठतात. मला सर्वाना सांभाळून घ्यावे लागते. अनधिकृत बांधकामांना पाठबळ देऊ नका, कठोर भूमिका घ्या, नद्या-नाल्यांचा प्रवाह अडवू नका, फोटो व प्रसिध्दीसाठी कामे करू नका, एकापेक्षा अनेक रस्त्यांना तीच-ती नावे देत बसू नका, असे त्यांनी खडसावले. नाशिकफाटा पुलाला टाटा यांचे नाव देण्याची सूचना करत नामकरणाचा भावनिक मुद्दा करू नका, असे ते म्हणाले. पुणे व पिंपरीत सीसीटीव्ही बसवण्यासाठी आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याने हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुक्त परदेशी यांनी प्रास्ताविकात हेल्पलाईनची संकल्पना स्पष्ट केली. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. तानाजी िशदे यांनी आभार मानले.
एलबीटीमुळे ३०० कोटींचा फटका
जकात रद्द करून एलबीटी लागू केल्याने वर्षांकाठी ३०० कोटींचा फटका बसणार असून त्याचा परिणाम विकासकामांवर होऊ शकतो, अशी शक्यता अजितदादांनी व्यक्त केली. टाटा मोटर्स, फियाट, फोक्स व्ॉगन यासारख्या कंपन्यांचे उत्पादन कमी झाले असून वाहनांना उठाव नाही. छोटय़ा उद्योगांना झळ बसते आहे. मंदीला घाबरून जाऊ नका, असे सांगत उत्पन्न कमी झाले असल्याने वायफळ खर्च टाळा, असे आवाहन त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा