महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या सहा एईडी प्रचाररथांचे उद्घाटन आमदार माधुरी मिसाळ आणि चंद्रकांत मोकाटे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये या रथांच्या माध्यमातून सहाशे सभा घेतल्या जाणार आहेत.      
या प्रत्येक एलईडी रथावर ऐंशी चौरसफुटांचा पडदा बसवण्यात आला असून या पडद्यावर बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या भाषणांच्या ध्वनिचित्रफिती दाखवल्या जाणार आहेत. शहरातील सर्व लहान-मोठय़ा चौकांमध्ये या रथांच्या माध्यमातून सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुण्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांची आकडेवारी पाहता पुण्याचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे महिलांच्या दृष्टीने पुणे पूर्णत: असुरक्षित आहे, अशी टीका आमदार माधुरी मिसाळ यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. आमदार मोकाटे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, तसेच शिवसेनेचे बाळा टेमकर, भाजपचे प्रा. श्रीपाद ढेकणे, शिवराम मेंगडे, उज्ज्वल केसकर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, अनिल शिरोळे यांनी शनिवारी सकाळी कर्वेनगर व परिसरातील विविध उद्यानांमध्ये आलेल्या नागरिकांच्या भेटी घेतल्या. नगरसेवक प्रशांत बधे, प्रा. मेधा कुलकर्णी तसेच जयंत भावे, प्रशांत हरसुले आदींची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर व्हीआयटी व बिबवेवाडी परिसरातही पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार गिरीश बापट व पदाधिकाऱ्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मनसे ही राष्ट्रवादीची ‘बी टीम’
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच बी टीम आहे. विरोधी पक्ष म्हणून काम करण्याऐवजी महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच मनसेने सदैव मदत केली आहे, अशी टीका या पत्रकार परिषदेत उज्ज्वल केसकर यांनी केली. भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध असतानाही मनसेने राष्ट्रवादीला साथ दिल्यामुळेच करवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यामुळेच पुणेकरांवर करवाढ लादली गेली, असेही ते म्हणाले.