समाजातील विविध प्रश्नांचा, समस्यांचा, तसेच नव्या कायद्यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने स्थापन होत असलेल्या मंथन अभ्यास गटाचे उद्घाटन शनिवारी (३० नोव्हेंबर) होत असून पहिल्या कार्यक्रमात ‘पुण्याचे पर्यटन: सद्य:स्थिती आणि दिशा’ या विषयावर सादरीकरण आणि गटचर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘अलर्ट’ या स्वयंसेवी संस्थेने मंथन गटाची स्थापना केली असून दर महिन्यातून दोन वेळा अभ्यास गट आयोजित केला जाणार आहे. उपक्रमाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी चार वाजता म्हात्रेपुलाजवळील महालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. सार्वजनिक तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि कार्यकर्त्यांना विविध प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच कायदे माहिती होण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठी सतत वेळ देणे व प्रयत्न करणे शक्य होत नाही. ही त्रुटी लक्षात घेऊन ‘मंथन’ या अभ्यास गटाची स्थापना केली जात असल्याचे ‘अलर्ट’च्या अध्यक्षा, खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.
उद्घाटन सत्रानंतर ‘पुण्याचे पर्यटन: सद्य:स्थिती आणि दिशा’ या विषयावर सादरीकरण व गटचर्चा होतील. पर्यटन क्षेत्रात पुण्याचे नाव व्हावे यासाठी काय करता येईल, या विषयासह पुण्यात सुरू असलेला हेरिटेज वॉकचा उपक्रम, पर्यटन महामंडळाचा जिल्हा पर्यटन आराखडा, मनोज हाडवळे यांनी तयार केलेला जुन्नर पर्यटन आराखडा आदी अनेक विषयांचा अभ्यास या वेळी होईल. दीपक बिडकर आणि संजीवनी जोगळेकर हे मंथन अभ्यासगटाचे समन्वयक असून हा उपक्रम नि:शुल्क आहे. नावनोंदणीसाठी ९८५०५८३५१८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader