महापालिका आणि पीएमपीतर्फे सुरू केल्या जात असलेल्या संगमवाडी येथील नव्या बीआरटी मार्गाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (३० ऑगस्ट) केले जाणार आहे. याच कार्यक्रमात कोथरूड ते लोहगाव विमानतळ आणि हिंजवडी ते लोहगाव विमानतळ या दोन नव्या सेवांचेही उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवाशांसाठी एक महिना मोफत बीआरटी सेवा दिली जाईल.
संगमवाडी बीआरटी मार्गाचे काम दीर्घकाळ रेंगाळले होते. हे काम पूर्ण होण्यासाठी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी गेले दोन महिने सातत्याने पाठपुरावा केला तसेच महापालिका प्रशासन आणि पीएमपी प्रशासन यांच्या विविध विभागांमार्फत हे काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला. या सात किलोमीटर लांबीच्या मार्गाचे पूर्ण झाले आहे. गेला महिनाभर या मार्गावर चाचणी फेऱ्या सुरू होत्या.
या नव्या बीआरटी मार्गाचे उद्घाटन शनिवारी केले जाणार असून ३० ऑगस्ट ते २९ सप्टेंबपर्यंत या मार्गावर प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. त्यानंतर या सेवेसाठी नेहमीप्रमाणे भाडे आकारले जाईल. या मार्गावर अत्याधुनिक सेवा देण्यात आली असून पीएमपीच्या इतर गाडय़ा व बीआरटी यांच्या दरात कोणतीही तफावत नसल्याचे सांगण्यात आले. या मार्गावर जे थांबे आहेत त्या थांब्यांवर तसेच गाडय़ांमध्येही प्रवाशांना तिकीट देण्याची व्यवस्था आहे. अधिकाधिक प्रवाशांनी बीआरटीचा वापर करावा आणि त्यांना या मार्गाची माहिती व्हावी यासाठी या मार्गावर एक महिना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा