महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा परिचय करून देणारी विनोद धोकटे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकधारा.. भरतनाटय़म आविष्कारातून प्राजक्ता माळी हिने साकारलेली ‘त्रिशक्ती आदिमाया’ ही सरस्वती वंदना.. रत्नाकर शेळके डान्स अॅकॅडमीच्या ८० कलाकारांनी सादर केलेल्या १२ गीतांवरील नृत्यातून उलगडलेली भारतीय चित्रपटांची शताब्दी.. लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्काराच्या मानकरी अप्सरा जळगावकर यांनी सादर केलेले लावणीनृत्य.. केंद्र सरकारच्या गीत आणि नाटक प्रभागाच्या कलाकारांनी घडविलेले विविध प्रांतातील लोकनृत्याचे दर्शन.. अशा विविधरंगी कार्यक्रमांच्या सादरीकरणाने पुणे नवरात्र महोत्सवाचे शनिवारी शानदार उद्घाटन झाले.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते देवीची आरती करून पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन झाले. खासदार सुरेश कलमाडी, महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, आमदार रमेश बागवे, शरद रणपिसे, माधुरी मिसाळ, मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, महोत्सवाचे संयोजक नगरसेवक आबा बागूल, जयश्री बागूल या प्रसंगी व्यासपीठावर होते. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागूल, ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे, भारुड कलाकार पद्मजा कुलकर्णी आणि लावणी कलावती अप्सरा जळगावकर यांना ‘लक्ष्मीमाता कला संस्कृती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. विनय आपटे यांच्यावतीने त्यांच्या भगिनी आरती गोगटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महोत्सवातील सांस्कृतिक महोत्सवाचे प्रमुख स्व. केशवराव बडगे यांच्या पत्नी कविता बडगे यांचा या वेळी कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
पुणे फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच मेट्रोसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पुणे हे महोत्सवांचे शहर झाले आहे. त्यामध्ये पुणे नवरात्र महोत्सवाचे स्वतंत्र स्थान आहे, अशा शब्दांत कलमाडी यांनी बागूल यांचा गौरव केला. यंदाचे वर्ष माझ्यासाठी पुरस्कारांचे वर्ष ठरले असून माझ्यावर लक्ष्मी आणि सरस्वती प्रसन्न झाल्या आहेत, अशी भावना अशोक पत्की यांनी व्यक्त केली.

आबा, काळजी करू नका
पुणे नवरात्र महोत्सवाचे संयोजक आबा बागूल यांनी प्रास्ताविकामध्ये विविध उपक्रमांची माहिती देत आता आपल्यावर मोठी जबाबदारी द्यावी, अशी अपेक्षावजा मागणी बोलून दाखविली. त्याविषयी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले,‘‘आबा बागूल हे महापालिकेत आणि संघटनेमध्येही उत्तम काम करीत आहेत. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची किमया त्यांच्यामध्ये आहे. पुणे नवरात्र महोत्सव हा कलाकारांचा सन्मान करणारा महोत्सव आहे. तुमच्याकडे आमचे लक्ष आहे. त्यामुळे आबा, काळजी करू नका.’’

Story img Loader