सार्वजनिक खुले ग्रंथालय.. युरोप, अमेरिकेत प्रचलित असलेली ही संकल्पना पुण्यात पहिल्यांदाच साकारत असून, तसे विज्ञान विषयाला वाहिलेले पहिलेच ग्रंथालय पुण्यात येत्या रविवारपासून सुरू होत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून मिळवलेले विज्ञानविषयक दर्जेदार ग्रंथ या ठिकाणी कोणताही अभ्यासक, लेखक व सामान्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.
पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच वैयक्तिक संग्रहातून हे ग्रंथालय साकारले आहे. त्यांच्याच रावत नेचर अकादमीतर्फे (आरएनए) सातारा रस्त्यावरील पेंटॅगॉन इमारतीत (पंचमी हॉटेलजवळ) ते रविवारपासून सुरू होत आहे. त्यात विज्ञानाच्या, मुख्यत: जीवशास्त्र या विषयातील उत्कष्ट अशा तब्बल तीन हजार ग्रंथांचा संग्रह आहे. उत्क्रांती, जीवशास्त्रातून निर्माण होणारे तत्त्वज्ञान, विज्ञान शिक्षण, वैज्ञानिकांची चरित्रे, प्राणी-वनस्पती व इतर जीवांची चरित्रे, विविध वैज्ञानिकांनी काढलेल्या मोहिमांच्या नोंदी, भारतीय विज्ञानलेखकांची पुस्तके, विज्ञान विषयातील शब्दकोश, विज्ञान विषयावरील मराठीतील पुस्तके अशा विविध विषयांवरील विभाग या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ग्रंथालयाच्या दालनाला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ ‘डार्विन’ याचे नाव देण्यात आले आहे. रावत आणि प्रा. प्रदीप आपटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
‘अमेरिका, युरोपमधील देशांमध्ये खुल्या सार्वजनिक ग्रंथालयांची संकल्पना रुजली आहे. आपल्याकडे अशी ग्रंथालये नाहीत. ती सुरू झाली तर विज्ञानविषयक लेखक, संशोधक व या विषयाची आवड असलेल्या सामान्य नागरिकांनाही त्याचा लाभ घेता येईल. त्याद्वारे समाजातील विज्ञानविषयक गैरसमज दूर व्हावेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, हा त्यामागचा उद्देश आहे. सध्या या ग्रंथालयातील बरीच पुस्तके पुण्यातील इतर कोणत्याही ग्रंथालयात किंवा संशोधन संस्थेतही उपलब्ध नसतील अशी आहेत. जिज्ञासू व अभ्यासकांसाठी या ग्रंथालयात ग्रंथांबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून इतरही वैज्ञानिक साहित्य ई-स्वरूपात पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध असतील. लोकांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा,’ असे आवाहन रावत यांनी केले.
या ग्रंथालयाच्या जोडीनेच विज्ञानप्रसारासाठी विविध तज्ज्ञांची व्याख्याने, विज्ञानशिक्षकांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प व इतरही विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्घाटन येत्या रविवारी
या ग्रंथालयाचे उद्घाटन येत्या रविवारी (१४ एप्रिल) दुपारी ४ ते ६.३० या वेळात पेंटेगॉन इमारतीतच होणार आहे. या वेळी ज्येष्ठ जीवशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ‘आयसर’ चे प्रो. एल. एस. शशिधरा, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांची उत्क्रांती या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of punes first open library namely darwin on sunday
Show comments