विधानभवनाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. इमारत चांगली झाली आहे; त्याबरोबरीने आता कामाचा दर्जा सुधारा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केली. शहरांलगतच्या छोटय़ा नगरातील विकास नियोजनबद्ध व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
विधानभवन येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त विकास देशमुख, अपर आयुक्त श्याम देशपांडे, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, सभागृहनेते सुभाष जगताप या वेळी उपस्थित होते.
राज्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद केली जाणार असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले,की मुंबई आणि नागपूर येथील जिल्हा नियोजन समितींना ऐतिहासिक इमारतींच्या संवर्धनासाठी २५ कोटी रुपये दिले आहेत. पुणे जिल्ह्य़ामध्येही अशा अनेक इमारती आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला तर निधीची तरतूद करता येईल.
वळसे-पाटील म्हणाले,‘‘ राज्यातील शहरांचा विकास गतीने होत असल्यामुळे शहरालगतची छोटी गावेही विकसित होत आहेत. पण, येथील विकासाला नियोजन नाही. हे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी एमआरटीपी अॅक्टमध्ये सुधारणा केली जाणार आहे.’’

कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारावीत
पुण्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. सर्वाना निवासस्थानांची व्यवस्था करणे सध्या अशक्य होत आहे. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने उभारावीत, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी वळसे-पाटील बोलत होते. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, महापौर चंचला कोद्रे, आमदार बापू पठारे, अशोक पवार, रमेश थोरात, बाळा भेगडे, मोहन जोशी या वेळी उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात ७०० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. या कामांच्या पूर्ततेनंतर उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार होतील. 

Story img Loader