स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांच्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, विरोधी पक्षाकडून तसा कांगावा सुरू असून त्याचे राजकीय भांडवल केले जात आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चिंचवडला व्यक्त केली. तांत्रिक मुद्दय़ावर न्यायालयात शेट्टी यांच्यावरील खुनाचा गुन्हा टिकणार नाही. मात्र, त्यांच्या चिथावणीमुळे मोर्चा निघाला व त्यात पोलिसाचा मृत्यू झाला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असेही ते म्हणाले. मुंबई पोलीस आयुक्ताची नियुक्ती प्रत्येक वेळी ज्येष्ठतेवर होत नाही तर कामावर व कर्तृत्वावरही होते, हे आरोप करणाऱ्यांना माहिती नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुणे पोलीस परिमंडल ३ च्या वतीने भाडेकरूंची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन आबांच्या हस्ते झाले. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, उपायुक्त शहाजी उमाप, जालिंदर सुपेकर, मोहन विधाते आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले,की ज्या प्रकरणात राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तो सव्वा वर्षांपूर्वी घडलेला प्रकार आहे. पोलीस त्यांना अटक करू शकत होते. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. घटनेच्या वेळी शेट्टी तेथे नव्हते. मात्र, त्यांच्या चिथावणीमुळे तो प्रकार घडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मृत पोलिसाच्या हत्येप्रकरणात न्यायालयात चार्जशीट दाखल होईल, जबाबदारी निश्चित होईल, तेव्हा शेट्टी यांच्यावरील ३०२ चा गुन्हा टिकणार नाही. पोलिसांनी राजकीय हेतूने कारवाई केलेली नाही. मात्र, तरीही विरोधी पक्षांकडून नुसताच कांगावा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी अनेकदा सहकार्याची भूमिका घेतली आहे. वेळप्रसंगी मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. मात्र, त्याची जाणीव या नेत्यांना नसून ते केवळ राजकीय हेतूने आरोप करत आहेत, असे ते म्हणाले.
राजू शेट्टी यांच्यावरील गुन्ह्य़ांचे विरोधकांकडून राजकीय भांडवल- आर.आर. पाटील
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांच्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, त्याचे राजकीय भांडवल केले जात आहे, अशी प्रतिक्रिया आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली.
First published on: 18-02-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of website for online information of tenant by r r patil