लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोणी काळभोर भागातील म्हातोबाची आळंदी गावात एका शेतात अफुची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली.

याप्रकरणी मंगल दादासाहेब जावळकर (वय ४५, रा. म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर, ता. हवेली) हिला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.

पुणे-सोलापूर रस्त्यावर म्हातोबाची आळंदी गाव आहे. जगताप मळा रस्त्यावर मंगल जावळकर हिची जागा आहे. या जागेत अफुची लागवड करण्यात आली होती. तेथे अफुची ६६ झाडे लावण्यात आल्याची माहिती खबऱ्याने लोणी काळभोर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पंचासमक्ष तेथे छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत तेथे अफुची ६६ झाडे लावण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर जमीन मालक जावळकर हिला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, हवालदार क्षीरसागर, वणवे, कटके, कुदळे, नानापुरे, तेलंगे यांनी ही कारवाई केली.

अफू लागवडीचे दोन प्रकार

यापूर्वी लोणी काळभोर भागात शेतात अफुची लागवड करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. अफुची बेकायदा लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे. शेतात अफू, गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक राजेंद्र उन्हाळे यांनी दिला आहे. वर्षभरापूर्वी उजनी धरणाच्या पाणलोटात केळीच्या शेतात अफुची लागवड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.

Story img Loader