पुणे : अफूची लागवड करण्यास बंदी असताना खेड तालुक्यातील थिगळस्थळ येथे एका शेतकऱ्याने अफूची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एक लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली; तसेच शेतकऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
सुभाष गुलाब थिगळे (रा. थिगळस्थळ, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे ) असे गुन्हा दाखल केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजगुरूनगरपासून काही अंतरावर असलेल्या थिगळस्थळ गावात चासकमान धरणाच्या कालव्याजवळ थिगळे यांनी अफूची लागवड केली होती. अफूच्या लागवडीस बंदी घालण्यात आली आहे. खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. थिगळे यांनी शेतात कांदा आणि लसणाची लागवड केली होती.
आंतरपीक म्हणून थिगळे यांनी अफूची झाडे लावल्याचे उघडकीस आले. अफूच्या झाडांची वाढ झाली होती. पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाने ६१ किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफुच्या झाडांची किंमत एक लाख रुपये आहे. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, उपनिरीक्षक भारत भोसले. हवालदार शंकर भवारी, संतोष घोलप, संतोष मोरे, प्रवीण गेंगजे आदींनी ही कारवाई केली.