लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात अफू विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५६ लाख ९० हजार रुपयांची दोन किलो ८४५ ग्रॅम अफू जप्त करण्यात आली.
देवीलाल शंकरलाल अहिर (वय ४२, रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात एक जण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. दुचाकीवरुन आलेल्या अहिरला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. दुचाकीची डिक्की उघडल्यानंतर त्यात अफू सापडली. पोलिसांच्या पथकाने अफू, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला. अहिरने अफू कोठून आणली, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.