पुण्याच्या कक्षा विस्तारत असताना परिसराचा नियोजनबद्ध विकास करून त्याचे रूप पालटण्याची संधी मुंबई-बंगळुरू इंडस्ट्रियल कॉरेडरमुळे मिळणार आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कशी केली जाते यावर ते अवलंबून असेल, असे मत प्राज इंडस्ट्रिजचे प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.
केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्पात ‘मुंबई-बंगळुरू इंडस्ट्रियल कॉरेडोअर’ ची घोषणा केली. या औद्योगिक पट्टय़ात पुण्याचा समावेश होत असल्याने पुण्यालाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या पट्टय़ात नवी शहरे व औद्योगिक वसाहती उभारण्यात येतील. त्यात उद्योग, कंपन्यांची कार्यालये, निवासी वसाहती, शाळा-महाविद्यालये, व्यापारी केंद्रं, वाहतूक व्यवस्था यांचा समावेश होतो. हे सारे नियोजनबद्ध असल्याने त्यामुळे पुण्याच्या आसपासचा परिसर चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो. पुण्याच्या परिसरात पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यालाही यामुळे चालना मिळू शकेल. पुण्याच्या परिसराचा प्रत्यक्ष विकास आणि त्यामुळे पुण्यावरील बोजा कमी होण्याचा अप्रत्यक्ष फायदा पुण्याला मिळेल. परिणामी पुण्यात शिक्षण, नोकऱ्या, रोजगाराच्या संधी वाढतील. विविध सुविधा अपेक्षित असल्याने जीवनमान व दर्जाही सुधारेल, असेही चौधरी यांनी सांगितले.