लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्यभरातील शाळांतील विद्यार्थ्यांना पूरक वाचनासाठी समग्र शिक्षणच्या ग्रंथालय उपक्रमात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण पुस्तकांची निर्मिती करण्यात येणार आहे. विविध संकल्पनांवर, शालेय स्तरानुसार मराठी, हिंदी, ऊर्दू, इंग्रजी भाषांतील पुस्तके तयार केली जाणार असून, त्यासाठी राज्यभरातील शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुलांसाठी लेखन करण्याची संधी मिळणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने २०२३-२४मध्ये ग्रंथालय उपक्रमाअंतर्गत मराठी आणि ऊर्दू भाषांमध्ये पुस्तकांची निर्मिती करून जिल्हा परिषद शाळांच्या ग्रंथालयांना उपलब्ध करून दिली होती. यंदा हा उपक्रम अधिक व्यापक पद्धतीने राबवला जाणार आहे. शाळेच्या ग्रंथालयांसाठी मराठी, ऊर्दूसह हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचनासाठी पुस्तकांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. पहिली ते तिसरी, चौथी-पाचवी, सहावी-आठवी, नववी-दहावी, अकरावी-बारावी अशा स्तरांसाठी कथा, कविता, सामान्य ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, चरित्रे, प्रवास वर्णन, आरोग्य आणि सुरक्षितता, स्पर्धा परीक्षा, कला-क्रीडा अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांची निर्मिती करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-वारजे भागातून सायकल चोरणारे गजाआड, चोरट्यांकडून ३० सायकली जप्त
पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेत जिल्हा आणि राज्यस्तरावर पुस्तकांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जास्तीत जास्त पुस्तकांची निर्मिती करून त्यातून दर्जेदार पुस्तके राज्यस्तरासाठी पाठवली जातील. राज्यभरातून आलेल्या पुस्तकांची स्वतंत्र समितीद्वारे निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय समितीने निवडलेल्या पुस्तकांच्या लेखकांना त्यांच्या पुस्तकांचा दर्जा, पृष्ठसंख्या, नावीन्यपूर्णता असे निकष विचारात घेऊन मानधनही दिले जाणार आहे. त्यामुळे पुस्तक मुलांना आवडीचे, आनंददायी वाटावे, त्यात चित्रे असावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील प्रतिभावंत शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लेखनाची संधी दिली जाणार आहे. उपक्रमात तयार होणारी पुस्तके राज्यभरातील सुमारे ६५ हजार शाळांमध्ये वितरित केली जाणार आहेत.