शहरासह जिल्ह्य़ाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीतील नावे तपासणे आणि नव्याने नाव नोंदणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत नाव, लिंग, पत्ता, वय, जन्मतारीख याबाबत काही त्रुटी असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करण्याची आणि मतदार म्हणून नाव नोंदवण्याची संधी मतदारांना आहे. रविवारी (३ मार्च) शहरासह जिल्ह्य़ातील विधानसभा मतदारसंघ स्तरावरील मतदान केंद्रांवर ही मोहीम राबवली जाईल.

अंतिम मतदार यादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्य़ात एकूण मतदारांची संख्या ७३ लाख ६९ हजार १४१ झाली आहे. ‘गो व्हेरिफाय’ या मोहिमेंतर्गत मतदार यादीतील मतदाराचे नाव आणि तपशील तपासण्यासाठी मतदार यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदार यादीत अद्यापही नोंद झाली नसेल, तर नोंद करून घेण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावरील मतदान केंद्रांवर मतदान केंद्र अधिकारी मतदारांकडून अर्ज स्वीकारणार आहेत.

मतदार यादीत नाव असे शोधा

* मतदार यादीत नाव शोधण्यासाठी

* http://electoralsearch.in  * http://www.ceo.maharashtra.gov.in

* http://www.nvsp.in

ही संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संकेतस्थळावर जाऊन, त्यावर मतदाराने आपले नाव, वडील किंवा पतीचे नाव, आडनाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर संबंधित मतदाराचे नाव यादीमध्ये आहे किंवा कसे, हे समजू शकेल. या बरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ‘व्होटर हेल्पलाइन’ नावाचे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नावाची माहिती मिळवता येईल. तसेच १९५० या  हेल्पलाइनवर संपर्क साधून मतदारांना माहिती मिळू शकणार आहे.

Story img Loader