लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाळेतर्फे व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रम दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली असून, २४ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. प्रवेश परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी ही माहिती दिली. या विभागातर्फे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवण्यात येतात. आता त्यात एमबीए अभ्यासक्रमाची भर पडणार आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा संगणकाद्वारे घेतली जाणार आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना स्वतंत्र अर्ज भरावे लागतील. परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेसाठी एक तासाचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन आणि दूरस्थ अशा स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन किंवा दूरस्थ यातून एका प्रकारच्या अभ्यासक्रमाची निवड करावी लागणार आहे. प्रवेशानंतर अभ्यासक्रम बदलता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आता भयमुक्त, पोलिसांकडून औद्योगिक तक्रार निवारण पथकाची स्थापना

विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच एमबीए अभ्यासक्रम ऑनलाइन आणि दूरस्थ पद्धतीने राबवला जाणार आहे. या अभ्यासक्रमाला देशभरातून कोणालाही प्रवेश घेता येईल. मात्र, अभ्यास केंद्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमध्येच असतील. प्रवेश परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना घरबसल्या परीक्षा देता येईल. परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. या अभ्यासक्रमाचा प्रतिसाद पाहून वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्याचाही विचार करण्यात येईल, अशी माहिती जाधव यांनी दिली. अभ्यासक्रम आणि प्रवेश परीक्षेबाबतची अधिक माहिती http://unipune.ac.in/sol/admission2024.html या दुव्यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity to do mba online and remotely savitribai phule pune university begins registration for entrance exam pune print news ccp 14 mrj