लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भारतातील युवा वर्गाला कार्यप्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) माध्यमातून रोजगारक्षम करण्यासाठी गेल्या वर्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबवण्यात येत आहे. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १२ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

ऑक्टोबर २०२४ मधील सदर योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यांद्वारे एक लाखाहून अधिक कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेत सहभागी होण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांहून कमी असणारे २१ ते २४ वयोगटातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर उमेदवार पात्र आहेत. तसेच पदव्युत्तर पदवीधारक, सध्या पूर्णवेळ शिक्षण घेणारे, कौशल्य प्रशिक्षण, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिसशिप) प्रोत्साहन योजना, ॲप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेले अथवा नोकरी करणारे उमेदवार पात्र ठरणार नाहीत.

उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून कमाल तीन कंपन्यांमध्ये कार्यप्रशिक्षणासाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांना १२ महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. त्यासाठी उमेदवारांना दरमहा ५ हजार रुपये आर्थिक साहाय्य, तसेच ६ हजार रुपये एकरकमी दिले जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी रास्ता पेठेतील जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे किंवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले.

Story img Loader