भारतीय चित्रपटाचे शताब्दी वर्ष साजरे होत असताना पुण्यातील आगरवाल फिल्म कंपनीने आठ दशकांपूर्वी निर्मित केलेला  ‘दिलेर जिगर’ म्हणजेच ‘गॅलंट हार्ट’ हा दुर्मिळ मूकपट गुरुवारी (१८ एप्रिल) पाहण्याची संधी लाभणार आहे. मूकपटाचा कालखंड अस्त होण्याकडे वाटचाल करीत  असताना आणि ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या बोलपटाचा कालखंड सुरू होण्याआधी अस्तित्वात असलेल्या या कंपनीद्वारे १९३१ मध्ये मूकपटांची निर्मिती केली होती. 
‘जनवाणी’ संस्थेतर्फे आयोजित ‘विरासत २०१३’ या हेरिटेज सप्ताहाअंतर्गत गुरुवारी चित्रपटांचे जतन करणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना हा दुर्मिळ मूकपट दाखविण्यात येणार आहे. त्यानंतरच्या सत्रात संस्थेच्या विविध विभागांमध्ये होणाऱ्या कामाची माहिती जाणून घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राजक्ता पणशीकर यांनी दिली.
या मूकपटाविषयी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे चित्रपट जतन अधिकारी किरण धिवार म्हणाले, ‘‘प्रभात’ चा कालखंड सुरू होण्याआधी आगरवाल फिल्म कंपनी ही संस्था अस्तित्वात होती. या कंपनीद्वारे ‘दिलेर जिगर’ मूकपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘आलम आरा’ या पहिल्या बोलपटाविषयी दुर्दैवाने काहीही अस्तित्वात नाही. १९३१ मध्ये प्रभातचा ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला बोलपट पडद्यावर झळकला. त्याच्या दोन वर्षे आधी श्याम सुंदर आगरवाल यांनी या मूकपटाची निर्मिती केली होती. जी. पी. पवार हे दिग्दर्शक असून त्यावेळी १६ वर्षांच्या असलेल्या ललिता पवार यांची त्यात मध्यवर्ती भूमिका आहे. पुण्यातील स्टुडिओमध्ये त्याचप्रमाणे बाह्य़ चित्रीकरणदेखील करण्यात आले असून मुद्राभिनयाद्वारे विनोद आणि स्टंट हे या मूकपटाचे वैशिष्टय़ आहे. ललिता पवार यांच्या निधनापूर्वी त्यांना हा मूकपट दाखविण्यात आला होता. या जुन्या आठवणींनी त्या भारावून गेल्या होत्या.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity to see rarest film for punekars on thursdays
Show comments