राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा स्थापनादिनानिमित्त दुर्मीळ चित्रठेवा पाहण्याची संधी

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या स्थापना दिनाननिमित्त संग्रहालयाच्या खजिन्यातील दुर्मीळ चित्रठेवा पाहण्याची संधी शुक्रवार (१ फेब्रुवारी) आणि शनिवारी (२ फेब्रुवारी) शहरातील रसिकांना मिळणार आहे. मूळ बंगाली भाषेतील ‘देवदास’ हा चित्रपट तसेच हिराबाई बडोदेकर यांच्या आवाजातील ध्वनिफीत या आणि अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी याबाबत माहिती दिली. मगदूम म्हणाले,‘ १९३५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘देवदास’ हा मूळ बंगाली भाषेतील चित्रपट तब्बल सतरा वर्षांनंतर भारतात दाखवला जाणार आहे. प्रमथेश बरूआ यांनी दिग्दर्शित केलेला आणि भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर ठरलेला ‘देवदास’ हा चित्रपट शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या ‘देवदास’ या कादंबरीवर आधारित आहे. बांगलादेशच्या चित्रपट संग्रहालयातून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला हा चित्रपट मिळाला असून त्याला आता इंग्रजी सबटायटल्सही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.’

हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका हिराबाई बडोदेकर आणि सरस्वती राणे यांच्या आवाजातील रागदारी, तर पं. गोविंदबुवा बुऱ्हाणपूरकर यांचे पखवाजवादन असलेली ध्वनिमुद्रिका यानिमित्ताने ऐकायला मिळणार आहे. रॉय किणीकर यांनी १९५० मध्ये दिग्दर्शित केलेल्या राजा केळकर संग्रहालयावरील लघुपटात लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी. व्ही. उर्फ दादासाहेब मावळणकर, तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ आणि पुण्याचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे यांची भाषणे आणि टीकाटिप्पणीही ऐकता येणार आहे.

सन १९१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिल्वामंगल’ या मूकपटाचे काही भागही या वेळी दाखविले जाणार आहेत. ताराचंद बडजात्या यांची निर्मिती आणि फानी मुजुमदार दिग्दर्शित पुदुच्चेरीतील अरविंदो आश्रमावरील दुर्मीळ लघुपट, कवी केशवसुत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास तयार करण्यात आलेला ‘कवींचा कवी’ लघुपट, महर्षी अण्णासाहेब कर्वे तसेच तंजावर, मदुराई, कोकण, दिल्ली, काश्मीर यांवर आधारित लघुपट, १९८२ मध्ये मुंबईत झालेल्या कामगारांच्या संपावर आधारित प्रदीप दीक्षित यांनी दिग्दर्शित केलेला लघुपट या वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमुळे किती विकास झाला यावर प्रकाश टाकणारे ‘आजचे पुणे, सोलापूर, अहमदनगर’ आणि ‘आजचे सांगली, कोल्हापूर, सातारा’ हे लघुपटही दाखवले जाणार आहेत.

प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात या लघुपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे. लघुपट प्रदर्शन शुक्रवारी सायंकाळी साडेसहा पासून आणि शनिवारी दुपारी चार पासून केले जाईल.