सहकारनगरमधील अध्यापक कॉलनीत महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या तारांगण प्रकल्पाला स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम यांनीही विरोध केला असून चांगले क्रीडांगण नष्ट करून तारांगण उभारू नये, असे पत्र कदम यांनी सोमवारी आयुक्तांना दिले.
स्थानिक नागरिकांचा एकमुखी विरोध असतानाही तारांगण प्रकल्पासाठीच्या कामाला महापालिकेने सुरुवात केली असून या प्रकल्पाला विरोध असल्याचे कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सहकारनगर भागात मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे एक चांगले क्रीडांगण नष्ट करून तेथे तारांगण करण्याऐवजी सहकारनगर पोलीस स्टेशनजवळ बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या जागेवर तारांगण उभे करावे, अशीही सूचना कदम यांनी केली आहे. शहराला तारांगणाची निश्चितच गरज आहे. मात्र त्यासाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा, असे कदम यांचे म्हणणे आहे.
या क्रीडा संकुलाचा गेल्या आठ वर्षांत वापर झालेला नाही. वारंवार निविदा काढूनही ते चालविण्यास घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे तेथे तारांगण उभे केल्यास या वास्तूचा व जागेचा चांगला वापर होऊ शकेल. तसेच अध्यापक कॉलनीतील मैदानही नष्ट होणार नाही, असे कदम यांचे म्हणणे आहे.