महिलांनी स्वसंरक्षणासाठी सोबत मिरची पूड, स्प्रे जवळ ठेवावे. त्याचबरोबर एक छोटासा चाकू ठेवून सोनसाखळी चोरटे अथवा इतर कोणी तुमच्या अंगावर येत असेल तर त्याच्यावर हल्ला करा. पोलीस तुमच्यावर काहीच कारवाई करणार नाहीत, असा सल्ला पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पुन्हा एकदा दिला.
शहर पोलिसांनी चोरटय़ांकडून जप्त केलेला मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत देण्यासाठी पिंपरी आणि निगडी पोलीस ठाण्यात कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्या वेळी पोळ बोलत होते. गेल्या वर्षीही पोळ यांनी महिलांना असाच सल्ला दिला होता. या प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील, शिवाजी शेलार, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेता मंगला कदम, शिवसेनेचे बाबा धुमाळ, पोलीस अधिकरी उपस्थित होते. या वेळी पोळ यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.
पोळ म्हणाले की, सोन्याचे भाव वाढल्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घरफोडी आणि लुटमार करण्यापेक्षा हे गुन्हे सोपे असल्यामुळे गुन्हेगार सोनसाखळी चोरी करत आहेत. त्यामुळे घटनांमध्ये वाढ होत आहे. हे गुन्हेगार बाहेरून येतात आणि सोनसाखळी चोरी करून परत निघून जातात. महिलांनी स्वत:च काळजी घेतल्यास या गुन्ह्य़ांना आळा बसेल. शाळा, महाविद्यालयात तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाऊन पालक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांबरोबर चर्चा करा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना पोळ यांनी दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा