लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महावितरणच्या वीजदर प्रस्तावाला विरोध करणे ग्राहकांसाठीच नुकसानकारक असल्याचे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे. ‘वीजदर नियामक आयोगाकडे सादर केलेल्या याचिकेमध्ये सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांसाठीचा वीजदर पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ही याचिका घातक कशी असेल? परिवाराचा कोणी सदस्य घरातील एखाद्या खोलीत व्यवसाय करत असेल, जसे शिकवणी, ब्युटी पार्लर, वकिलाचे कार्यालय इत्यादी, तर अनिवासी (व्यावसायिक) क्रमवारीनुसार शुल्क आकारण्यात येईल, असा आरोप काही संस्थांकडून करण्यात आला होता.

मात्र, सर्वसाधारण घरगुती ग्राहकांचा वीजवापर महिना ३०० युनिटपर्यंत असतो. अशा ग्राहकांच्या घरात एखाद्या खोलीत शिकवणी, ब्युटी पार्लर, वकिलाचे कार्यालय, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट अशा स्वरूपाचा व्यवसाय असेल आणि घरगुती वीजवापर ३०० युनिटपर्यंतच असेल किंवा वार्षिक ३६०० युनिटपर्यंत असेल, तर त्यांना घरगुती वीजदरच लागू करण्यात येईल. अशा घरांत विजेचा वापर व्यावसायिक वापरामुळे महिना ३०० युनिटच्या वर गेला, तर त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणे सवलत मिळणार नाही,’ असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आधी आपण सौर ऊर्जेतून जेवढी वीज तयार केली, ती २४ तासांत कधीही सेट ऑफ करू शकत होतो; पण आता आपण तयार केलेली वीज केवळ आठ तासांत सेट ऑफ करता येईल, म्हणजे आपली गरज १२ किलोवॅट सोलरची गरज असेल, तर आपल्याला केवळ ४ किलोवॅटचाच फायदा मिळेल, बाकी आठ किलोवॅटची बनविलेली सर्व वीज महावितरणला तीन-चार रुपये युनिट दराने विकावी लागेल आणि त्यांच्याकडून पुन्हा पंधरा ते सोळा रुपये दराने विकत घ्यावी लागेल, असाही आरोप महावितरणवर करण्यात आला होता. त्यावर, ‘हा विषय घरगुती ग्राहकांशी संबंधित नाही. ज्या घरगुती ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविले आहेत, त्यांच्या नेट मीटरनुसार सध्या होत असलेल्या हिशेबात कोणताही बदल प्रस्तावित नाही. त्यामुळे त्यांना झटकाही नाही,’ असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.

दिवसपाळीत काम करणाऱ्या उद्योगांना लाभ

‘महावितरणला विजेचे दर कमी करायचे आहेत. त्यासाठीच आयोगाकडे पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीजदर कमी करण्यात यावेत, असा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. तसेच, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात वीज वापरली, तर घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दरात अतिरिक्त सूटही देऊ केली आहे. त्यामुळे दिवसपाळीत व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना आणि दुकानदारांना विशेष लाभ होणार असून, या प्रस्तावाला आयोगाने मान्यता दिली, तर आगामी काळात राज्यातील उद्योगांचे विजेचे दर हे औद्योगिक क्षेत्रात स्पर्धा करणाऱ्या अन्य राज्यांप्रमाणेच असतील,’ असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

Story img Loader