केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी म्हणजेच उद्या पुण्यात येणार आहेत. मात्र त्यांचा हा दौरा त्याआधीच वादाचा विषय ठरत आहे. पुण्याच्या भाजपाशासित स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शाहांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकांवर केवळ भाजपा नेत्यांचे मोठे फोटो लावल्यावरुनही विरोधकांनी टीका केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १९ डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. ते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीची पायाभरणी करणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. शाहांच्या या दौऱ्यामुळे भाजपाला पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल अशी आशा पक्षाला आहे. या दौऱ्यासाठी अमित शाह यांचे फोटो असलेले मोठमोठे पोस्टर्स शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच नगरसेवकांनी मात्र शुक्रवारी आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. या पोस्टर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नाहीत, त्यामुळे त्यांचा अवमान झाल्याचा आरोप भाजपावर करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या दिपाली धुमाळ म्हणाल्या की भाजपा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होणाऱ्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम करत आहे. यातूनच त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकरांप्रती असलेली भावना स्पष्ट होत आहे. तर भाजपाकडून माफीची मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “सत्ताधारी भाजपला निवडणुकीच्या वेळीच राष्ट्रीय नेत्यांची आठवण येते. त्यांना राष्ट्रीय नेत्यांबद्दल आदर नाही. त्यांची कृती आणि विचार परस्परविरोधी आहेत.” शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या फोटोशिवाय या कार्यक्रमाचे होर्डिंग आक्षेपार्ह असल्याचे मनसेचे शहरप्रमुख वसंत मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, “हे जाणूनबुजून केले जात आहे की नाही हे शोधले पाहिजे.
दुसरीकडे भाजपाने विरोधी पक्षांनी आपल्या कार्यकाळात शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचा आरोप केला.भाजपचे नगरसेवक आणि सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, “विरोधक त्यांच्या कार्यकाळात नागरी इमारतीत राष्ट्रीय नेते आंबेडकर यांचा पुतळा लावण्यास विसरले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नागरी मुख्य इमारतीच्या आवारात बसवण्याचा पवित्रा सत्ताधारी भाजपाने घेतल्याबद्दल विरोधकांनी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आहे. त्यांनी सर्वच मुद्द्यांवर राजकारण करू नये”