बारामती : शिवसेनेतील नेते एकमेकांना गद्दार म्हणतात, पण त्याने राज्यातील प्रश्न सुटणार आहेत का? दोन लाख नागरिकांचे रोजगार गेले, देशात महागाई वाढली आहे, यावर बोलायला कोणीच तयार नाही. माणसे फोडण्याचेच काम केले जात असून, लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा झाला आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याचा गळीत हंगाम आणि गव्हाण पूजन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, कारखान्याचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, पुरुषोत्तम जगताप, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, सुदाम इंगळे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, राजवर्धन शिंदे आदी त्या वेळी उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात सुरू असलेल्या गोंधळामुळे कोणते सरकार किती दिवस टिकेल, हे अधिकाऱ्यांनाही समजेना. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. त्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होत आहे. हा गद्दार, तो गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत.