पिंपरी : आई वडिलांना शिव्या देणे ही आपली संस्कृती नाही. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा प्रकार आहे . असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. कोणीच कोणाला शिव्या देऊ नयेत. शिव्या दिल्याने बेरोजगारी, महागाई, कमी होणार आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य ऐकून ही तर विनाशकाले विपरित बुद्धी आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. आई वडिलांना शिव्या द्या. ती कोल्हापूरची पद्धत आहे, ते चालेल पण, नरेंद्र मोदी यांना शिव्या दिल्या तर त्या सहन करू शकत नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावरून अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आपल्या संस्कृतीत आपण कोणालाच शिव्या देत नाही. शिव्या दिल्याने नोकरी मिळणार आहे का? बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. पालकमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने असे बेताल वक्तव्य करणे चुकीचे आहे.
हेही वाचा : राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत ; अजित पवार यांचे वक्तव्य
मृतांना केलेली मदत तुटपुंजी
नाशिक मधील बस अपघातावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नाशिक येथील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. एकीकडे गोविंदाला दहा लाखांची मदत जाहीर केली होती. असा भेदभाव करू नये , निष्पाप नागरिकांचा यात दोष नाही. असे देखील अजित पवार म्हणाले.