राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. भाजपा २०१४ आणि २०१९ मध्ये सर्वदूर पोहोचली. याला एकमेव कारण नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींचा करिश्मा देशात चालला. त्यांनी देशात तसा विश्वास संपादन करत किंवा आपल्या भाषणातून जनतेला आपलंसं करण्याचं काम मोदींनी केलं आहे, असं अजित पवारांनी म्हटलं. ‘सकाळ’या वृत्तसमूहाने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “भाजपाकडे अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखं नेतृत्व होतं. तरीही त्यांना जे जमलं नाही, ते पंतप्रधान मोदींनी करून दाखवलं. भाजपाला पूर्ण बहुमत कधीच मिळालं नव्हतं. ते बहुमत मिळवून देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं.”
हेही वाचा : “मुख्यमंत्रीपदावर दावा ठेवण्याची आताही तयारी”, अजित पवारांच्या विधानावर बावनकुळेंचा टोला; म्हणाले…
“१९८४ नंतर पहिल्यांदा देशात २०१४ साली बहुमत असलेलं सरकार अस्तित्वात आलं. काँग्रेसच्या सरकारमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आपला करिश्मा निर्माण केला, हे नाकारता येणार नाही. मात्र, आज नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला, तर कोणतंही नाव समोर येत नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं.
“मतांची विभागणी टळल्यास २०२४ ला वेगळे चित्र दिसेल”
“सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याकरिता विरोधकांची मते एकत्रित राहिली पाहिजेत. मतांची विभागणी होता कामा नये. मतांची विभागाणी न झाल्यास काय होते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दिसले. त्यामुळे विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये समन्वय ठेवून महाविकास आघाडीने जागावाटप केले. तर, वेगळे चित्र पहायला मिळेल. यापुढील काळात आघाड्यांचेच सरकार चालेल. आता कोणत्याही एका पक्षाचे सरकार येण्याची शक्यता कमी आहे,” असं अजित पवार म्हणाले.