पुणे : चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यातच भाजपला आनंद आहे. अजित पवार यांचा वापर टेकू म्हणून भाजप करत आहे. भाजपची स्वबळावर जिंकण्याची ताकद नाही. तोडफोडीच्या राजकारणाने भाजपने लोकांचा विश्वास गमाविला आहे. त्यामुळे त्यांना या प्रकाराची गरज पडत आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सत्तेत सहभागी झाला आहे. मात्र लांडग्यांच्या कळपात गेलेल्यांना लांडगे सोडणार नाहीत, असेही ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर वडेट्टीवार यांनी रविवारी काँग्रेस भवनाला भेट दिली. काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी उपस्थित होते. वडेट्टीवार यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, शिवसेना फुटली असली तरी ठाकरे गटावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. शिंदे गटाचे फक्त दोन खासदार निवडून येतील, असे सर्वेक्षणातूनच पुढे आले आहे. राज्यात सध्या तोडफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत आहे.