पुणे : धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा जो निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे त्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी महापालिका मुख्य सभेत हंडा आंदोलन करण्यात आले. पाण्याचे लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करतानाच जलसंपदा विभागाकडून दिशाभूल करणारे आकडे सादर करण्यात येत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.

खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणातील पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा कमी असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. महापालिका या निर्णयाची अंमलबाजवाणी करत नसल्यामुळे खडकवासला धरणातील पाण्याचे दोन पंपही जलसंपदा विभागाकडून बंद करण्यात आले होते. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटल्यानंतर मुख्य सभेतही पाणी प्रश्नावरून आंदोलन करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला. धरणातून महापालिका प्रतिदिन घेत असलेल्या पाण्याबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या आकडेवारीत फरक आहे. पाणी घेण्यावरून जलसंपदा विभागाचे अधिकारी दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे पाण्याचे लेखापरीक्षण झाले पाहिजे, पाण्याची श्वेतपत्रिका काढण्यात यावी आणि जलसंपदाच्या कारभाराची तसेच पाणी वापराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी केली. सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न या निमित्ताने विरोधकांनी केला.