पुणे प्रतिनिधी: “आपण सर्वजण लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याबद्दल वाचत आलो आहे, पण अचानकपणे सावरकरांबद्दल विरोधी पाहण्यास मिळतो, हे पाहिल्यावर धक्का बसतो, पण समाजात विरोधाला विरोध करणे ही समाजात एक वृत्ती झाली असून त्या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करते” अशी भूमिका भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी मांडत विरोधकांना चांगलेच सुनावले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारकडून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. दरम्यान पुण्यातील डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक परिसरात भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आम्ही सारे सावरकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रिया बेर्डे म्हणाल्या की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता ‘आम्ही सारे सावरकर’ या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजातील प्रत्येक घटकाला नक्कीच समजतील. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे काही साहित्य आहे ते सर्वांनी वाचले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.