टोचून घेण्याची ‘आयपीव्ही’ (इनॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन) ही लस फेब्रुवारी- मार्चमध्ये राज्यातही देण्यास सुरुवात होणार आहे. तर एप्रिल २०१६ पासून तोंडावाटे देण्याच्या पोलिओ लशीत बदल करून तीनऐवजी दोनच प्रकारच्या पोलिओ विषाणूंवर काम करणारी ‘बायव्हॅलंट’ लस सुरू केली जाणार आहे.
पोलिओचे विषाणू टाईप १, २ आणि ३ असे तीन प्रकारचे आहेत. सध्या बालकांना दिली जाणारी ‘ओरल’ पोलिओ लस या तीन्ही विषाणूंवर लागू पडणारी ‘ट्रायव्हॅलंट’ लस आहे. परंतु टाईप २ पोलिओचे जगभरातून उच्चाटन झाल्याचे मानले जाते. या पाश्र्वभूमीवर एप्रिलपासून टाईप १ व ३ या दोनच विषाणूंवरील ‘बायव्हॅलंट’ ओरल पोलिओ लस देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. त्या म्हणाल्या,‘जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘पोलिओ एंड गेम स्ट्रॅटेजी’ असे नाव दिले आहे. राज्यात फेब्रुवारी- मार्चमध्ये आयपीव्ही लसही सुरू होत असून एक वर्षांच्या आतल्या मुलांना आयपीव्ही लशीचा एकच डोस दिला जाईल. आयपीव्ही लस सुरू झाली तरी ओरल पोलिओ लस बंद होणार नाही. दोन्ही लशी दिल्यामुळे पोलिओविरोधातली रोगप्रतिकारशक्ती अधिक सक्षम होण्यास मदत होईल.’

Story img Loader