पुणे : पुणे, रत्नागिरी, रायगड आणि विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांना हवामान विभागाने मंगळवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भात आठवडाभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की बंगालच्या उपसागरात ईशान्य दिशेला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भात पुढील आठवडाभर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मोसमी पावसाला पोषक स्थिती आहे. त्यामुळे किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आठवडाभर चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

कोकण, विदर्भात पावसाचा जोर

विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये ४०, गोंदियात २५, ब्रह्मपुरीत (चंद्रपूर) २०.४, अमरावतीत १०.४ मिमी पाऊस झाला. सोमवारी दिवसभरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. कोकण किनारपट्टीवरही पाऊस सुरू झाला आहे. सोमवारी दिवसभरात कुलाब्यात ५१ मिमी, तर अलिबागमध्ये १४ मिमी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये दिवसभरात ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ात बीडवगळता दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. बीडमध्ये हलक्या सरी झाल्या आहेत. 

  • ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ : पुणे, रत्नागिरी, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर
  • ‘यलो अ‍ॅलर्ट’ : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orange alert for pune konkan vidarbha heavy rain forecast pune print news dbj 20 ysh