पुणे : तलाठी भरती परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू असून सोमवारी मुंबईतील पवई आयआयटी पार्क परीक्षा केंद्रावर काही परीक्षार्थी उमेदवार विलंबाने केंद्रावर पोहोचल्याने नियमानुसार संबंधितांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्थानिक पोलीस, महसूल आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. त्यामध्ये परीक्षार्थी विलंबाने आल्याचे दिसून आले. दरम्यान, परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्यानंतर केलेल्या गोंधळाची रितसर तक्रार प्रशासनाकडून पोलिसांकडे दाखल करण्यात आली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यभरात तलाठी पदासाठी ४४६६ जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी दहा लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज छाननीअंती प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जात असून १७ ते २२ ऑगस्ट असा पहिला टप्पा पार पडला आहे, तर दुसरा टप्पा २६ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. सोमवारी मुंबईतील पवई आयआयटी पार्क परीक्षा केंद्रावर काही उमेदवार विलंबाने दाखल झाले. त्यामुळे त्यांना परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून प्रवेश नाकारण्यात आला.
हेही वाचा >>>मद्यपानाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांची फटकेबाजी; “अनेकांना अख्खा खंबा घेतला तरी…”
याबाबत अप्पर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते म्हणाले, ‘नियमाप्रमाणे परीक्षार्थींनी वेळेच्या आधी दीड तास येणे अपेक्षित आहे. या वेळेत अर्ज भरलेलाच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आला आहे किंवा कसे याची बायोमेट्रिक तपासणी करण्यात येते. संबंधित उमेदवार परीक्षा केंद्रावर विलंबाने दाखल झाल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्थानिक पोलीस, महसूल आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामध्ये उमेदवार विलंबाने आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधितांना प्रवेश नाकारण्यात आला. वास्तविक उमेदवारांच्या प्रवेशिकेवर किती वाजता परीक्षा केंद्रावर यायचे, ही वेळ लिहण्यात आली आहे. तसेच वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>>“म्हणून मला कार्यक्रमाला बोलवतात..”; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
दरम्यान, प्रवेश नाकारल्यानंतर संबंधित उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महसूल सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल सचिव यांच्याशी चर्चा केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही रायते यांनी स्पष्ट केले.