पिंपरी : पावसाळ्यात साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने कीटकजन्य, जलजन्य आजाराचा रुग्ण आढळून उपचारासाठी दाखल झाल्यास त्याची संपूर्ण माहिती त्वरित सादर करण्याचे आदेश महापालिकेने शहरातील सर्व खासगी डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक, प्रयोगशाळांना दिले असून, माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. कीटकजन्य अथवा जलजन्य आजार पसरत असल्याने कीटकजन्य, जलजन्य आजार झालेल्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, उपचार घेतल्याची तारीख, अहवालाची तारीख आदी तपशील संबंधित डॉक्टर, प्रयोगशाळेने त्वरित आपल्या क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका रुग्णालयास कळवणे बंधनकारक आहे.
कॉलरा, जापनीज इन्सेफलायटिस, डेंग्यू, संसर्गजन्य कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, चिकुनगुनिया यापैकी कोणत्याही आजाराचा रुग्ण आढळल्यास संबंधितांनी रुग्णाची माहिती आपल्या क्षेत्रीय रुग्णालयाला ई-मेल, लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले की, महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची नोंद ठेवली जाणार आहे. रुग्णांची माहिती वेळेत देण्यास टाळाटाळ केल्यास किंवा दुर्लक्ष झाल्यास साथरोग अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.