पुणे: करोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे दिले. विद्यापीठाने शुल्कमाफीसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करूनही महाविद्यालयांनी शुल्कमाफीची अंमलबजावणी केली नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आल्याने विद्यापीठाकडून पुन्हा नव्याने परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करून अंमलबजावणीचे निर्देश दिले होते. मात्र महाविद्यालयांकडून शुल्कमाफी करण्यात न आल्याने विद्यार्थी संघटनांकडून पाठपुरावा करण्यात येत होता. विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार करोनामुळे पालक गमावलेल्या आणि शुल्कमाफी न मिळालेल्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठाकडे पाठवली आहे. महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक यांनी संबंधित विद्यार्थ्यांची शुल्कांसंदर्भातील अहवाल ३१ जुलैपर्यंत पाठवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. तर निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी स्टुडन्ट हेल्पिंग हँडच्या कुलदीप आंबेकर यांनी केली.