येरवड्यातील मनोरुग्णालाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हटविण्यात याव्यात आणि सेवानिवृत्तीनंतरही शासकीय वसाहतीमध्ये राहत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून वसाहतीतील खोल्या ताब्यात घ्याव्यात, असे आदेश राज्याच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत.राज्याचे अपर मुख्य सचिवांनी मंगळवारी मनोरुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठकी घेतली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. रुग्णालयाच्या १५६ एकर क्षेत्रावर झालेली अतिक्रमणे आणि अन्य सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा >>>रब्बी हंगामात उच्चांकी पेरा; डिसेंबरअखेपर्यंत ६५ लाख हेक्टरवर लागवडीचा अंदाज
रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेली अकराशे मीटर लांबीची सीमाभिंत बांधणे, रुग्णालयाच्या आवारात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोगॅस प्रकल्प सुरू ठेवणे, मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या तीनशे झोपड्या हटविणे, राडारोडा उचलण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली. सेवकांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये काही कर्मचारी सेवानिवृत्तीनंतरही वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून खोल्या ताब्यात घ्याव्यात, अशी सूचनाही महापालिका प्रशासनाला करण्यात आली.