पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनसीडब्ल्यू) घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून सराइताने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. परगावी निघालेल्या तरुणीवर सराइताने बलात्कार केला. याप्रकरणी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत २६ वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर तीव्र पडसाद उमटले. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गंभीर दखल घेतली. रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा. आरोपीला गजाआड करण्यात यावे, तसेच बलात्कार प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास, पीडित तरुणीची फिर्यादीची प्रत याबाबतचा अहवाल येत्या तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावा, असे आदेश रहाटकर यांनी दिले आहेत.
ही घटना गंभीर, तसेच वेदनादायी आहे. याप्रकरणाचा तपास योग्य दिशेने करण्यात यावा. पीडित तरुणीला योग्य ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात यावी. तरुणीचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात यावे, तसेच तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आदेश रहाटकर यांनी दिले आहेत.