लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वास्तव्य करणारे परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी, तसेच बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.
पुणे स्टेशन परिसरात एका बांगलादेशी घुसखोर महिलेला बंडगार्डन पोलिसांनी नुकतेच पकडले. त्यानंतर शहरात गेल्या दहा वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी महर्षीनगर परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र सापडले. महर्षीनगर भागात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाकडून परदेशी चलनही जप्त करण्यात आले होते. बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या दलालांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आणखी वाचा-स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर पाच स्थानके? प्रस्ताव तयार करण्याबाबत कोणी केल्या सूचना?
पुणे शहरात परदेशातून वास्तव्यास येणारे विद्यार्थी, पर्यटन व्हिसावर येणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करून त्यांना पुन्हा मायदेशी पाठविण्याची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.