वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी लष्करातील जवानाला मूत्रपिंडाचे दान करून अवयवदान चळवळीचा प्रचार प्रसार करण्यास सुरुवात करणाऱ्या प्रमोद महाजन यांनी नुकताच ‘भारत ऑर्गन यात्रे’चा उपक्रम पूर्ण केला. या यात्रेत एकटय़ाने मोटारसायकल प्रवास करत देशातील एकोणीस राज्यांमध्ये त्यांनी अवयवदान विषयक जनजागृती केली.

महाजन यांनी पंजाब, गुजराथ, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांसह संपूर्ण दक्षिण भारतात ही यात्रा केली. बारा हजार किलोमीटरच्या या यात्रेदरम्यान त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे सुमारे पाच हजार नवीन नागरिकांनी मरणोत्तर अवयवदानाचे अर्ज भरले. महाजन सदुसष्ट वर्षांचे असून मूळचे सांगली जिल्ह्य़ातील रहिवासी आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेत काही काळ वाहक म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ समाजसेवेसाठी स्वत:ला झोकून दिले आहे.

प्रमोद महाजन म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी लष्करात कार्यरत असलेल्या एका तरुणाला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असल्याचे समजले. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा रक्तगट न जुळल्याने मूत्रपिंड उपलब्ध होण्यात अडचण होती. माझा रक्तगट जुळत असल्याने मी मूत्रपिंड देण्याची तयारी दाखवली. त्याकाळात अवयवदान ही चळवळ म्हणून अस्तित्वात नव्हती. मात्र जन्मत: एक मूत्रपिंड असलेल्या व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता येते हे माझ्या वाचनात आले होते. त्या तरुणाला नवे जीवन मिळाल्यानंतर मी कायमस्वरुपी अवयवदान विषयक कामात वाहून घेण्याचे ठरवले आणि ‘रीबर्थ फाउंडेशन’ या संस्थेशी जोडला गेलो. दररोज तीन समूहांशी संवाद साधत केलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

Story img Loader