योगेश येवले
२४० कुटुंबांचा कचरा व्यवस्थापनाला हातभार
सोसायटीचा कचरा सोसायटीतच जिरवून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प राबवून पिंपळे सौदागर येथील एका सोसायटीने शहरातील कचऱ्याच्या समस्येवर स्वतः पुरते उत्तर शोधले आहे. या प्रकल्पामुळे रोज जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होत आहे.
पिंपळे सौदागर येथील ‘वसंत अॅव्हेन्यू’ या सोसायटीत हा प्रकल्प राबवला जात आहे. सोसायटीत राहणाऱ्या तब्बल दोनशे चाळीस कुटुंबांनी एकत्र येऊन शहरातील कचरा समस्येवर मार्ग काढण्यासाठी सेंद्रिय खताच्या निर्मितीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सोसायटीतून ओला कचरा बाहेर जात नाही. योग्य त्या ठिकाणी पुनर्वापरायोग्य वस्तूंच्या वापराची सवयही नागरिकांना लागली आहे. कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील ‘इनोरा’ या संस्थेची यंत्रणा वापरून गेल्या दोन वर्षांपासून खतनिर्मिती करण्यात येत आहे.
इनोराचे अनिल गोकर्ण म्हणाले, एका कुटुंबाकडून दिवसाला सरासरी एक किलो तीनशे ग्रॅम कचरा जमा होतो. त्यामध्ये साडेसातशे ग्रॅम ओला कचरा असतो. दोनशे चाळीस कुटुंबांकडून मिळणाऱ्या ओल्या कचऱ्यातून दर तीन महिन्यांनी दोन हजार किलो सेंद्रिय खत तयार होते.
वसंत अॅव्हेन्यू सोसायटीचे अध्यक्ष राहुल घरटे म्हणाले, कचरा वेगळा करण्याचे महत्त्व नागरिकांना समजण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन सत्रे आयोजिण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे याबाबत घरोघरी जाऊन माहिती देण्यात आली. त्याचा उत्तम उपयोग झाला आणि सर्वानी सहकार्य करण्यास सुरुवात केली.
आता सोसायटीतील संपूर्ण ओला कचरा खत निर्मितीसाठी वापरला जातो. प्लास्टिकचा पुनर्वापर करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला महिन्यातून एकदा प्लास्टिक दिले जाते. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाविषयी सोसायटी स्वयंपूर्ण झाली आहे. खताचा वापर सोसायटीच्या बागेतील झाडांसाठी केला जातो. शिल्लक राहणारे खत विक्री करणे शक्य आहे.
वसंत अॅव्हेन्यूच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य निधी बाबर म्हणाल्या, मोठय़ा सोसायटय़ांनी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतची यंत्रणा उभी करावी, असे आवाहन महापालिकेने केले होते.
त्याला प्रतिसाद देण्यासाठी उभारलेल्या या यंत्रणेमुळे सोसायटी ओला कचरा मुक्त झाली आहे. पर्यावरण पूरक कामासाठी आम्ही योगदान देत आहोत.
खतनिर्मिती कशी होते
प्रथम ओला कचरा, सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा अशा तीन प्रकारात कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. खत निर्मितीसाठी सोसायटीच्या आवारात खत प्रकल्पासाठी पंधरा गुणिले चार फुटांच्या विटा, सिमेंट, वाळूपासून सात टाक्या बनविण्यात आल्या आहेत. प्रकल्पात आलेला ओला कचरा सर्व प्रथम बारीक केला जातो. हा कचरा खत निर्मितीसाठी बनविलेल्या टाक्यांमध्ये प्रक्रियेसाठी टाकला जातो. दररोज एकशे ऐंशी किलो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. दर तीन महिन्यांनी दोन हजार किलो सेंद्रिय खत या प्रकल्पात तयार होते. हा प्रकल्प उभा करण्यासाठी पाच लाख रुपये एवढा खर्च आला आहे.