पुण्यातील कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये यंदाची ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा १० ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहे.या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल ९०० स्पर्धक सहभागी होणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि स्पर्धेचे मुख्य संयोजक, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- पिंपरी- चिंचवड: भरधाव दुचाकीवर फोनवर बोलणं जीवावर बेतलं; अपघात होऊन तरुणाचा मृत्यू
महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच उदघाटन १० जानेवारी २०२३ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांच्या उपस्थित राहणार आहेत. तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या उपस्थित होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत राज्यातील ४७ तालीम मधील ९०० स्पर्धक होतील. तसेच यांना भरघोस अशी बक्षीस दिली जाणार आहेत. या स्पर्धेमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू आपल्या देशाच प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.