पिंपरी महापालिका तसेच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी यांच्या मान्यतेने आणि हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे ६ देशांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा होणार आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या या स्पर्धांसाठी ११ कोटी रुपये खर्चास प्रशासक आणि आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.

पिंपरी चिंचवड शहराला “स्पोर्टस् हब” म्हणून विकसित करण्याचा निर्धार –

उद्योगनगरी, कामगारनगरी आणि सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेले शहर असा नावलौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला “स्पोर्टस् हब” म्हणून विकसित करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यादृष्टीने शहरात विविध खेळांच्या स्पर्धांचे राष्ट्रीय पातळीवर आयोजन केले जात आहे. हॉकी इंडिया, हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच शहरामध्ये राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेहरूनगरच्या पॉलिग्रास मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धांचे नियोजन महापालिकेने यशस्वीरित्या पार पाडले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी हॉकी इंडियाने महापालिकेला दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.

विविध विभागामार्फत सोयी सुविधा आणि कामे करण्यासाठी खर्चास मान्यता –

त्यानुसार, सहा देशांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे नियोजन असून त्यासाठी विविध विभागामार्फत सोयी सुविधा तसेच कामे करण्यासाठी होणाऱ्या ११ कोटी रूपये खर्चास मान्यता दिली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Story img Loader