पुणे : राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (पेरा) या संघटनेतर्फे २०२२-२३ शैक्षणिक वर्षांत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पेरा सीईटी २६ ते २८ मे दरम्यान ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठी २० मे ही अंतिम मुदत असून, ३ जूनला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

पेरा इंडियाचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी ही माहिती दिली. खासगी विद्यापीठांतील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, वास्तुकला, विधी, कृषी आदी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेराकडून प्रवेश परीक्षा घेतली जाते. या सीईटीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना राज्यातील १५ खासगी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येतो. ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश परीक्षा देण्याची संधी मिळेल. अधिक माहिती  www.peraindia.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.