मेंदुमृत व्यक्तीच्या अवयवदानामुळे लिव्हर सोरायसिसने त्रस्त असलेल्या रुग्णाला जीवदान मिळाले आहे. या रुग्णावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली आहे. हडपसरमधील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या महिनाभरात रुग्णालयात दोन यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून, त्यामुळे दोघांना नवजीवन मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कल्याणीनगर अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या आईने चौकशीत पोलिसांना असहकार करत अशी दिली उत्तरे…

वाशीमहून आलेले संजय चव्हाण (नाव बदलले आहे.) हे गेल्या तीन वर्षांपासून लिव्हर सोरायसिसने त्रस्त होते. यकृताच्या गंभीर आजारामुळे त्यांची बिलिरुबिन पातळी आणि अस्काइट्समध्ये वाढ झाली होती. त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. मेंदुमृत झालेल्या ४७ वर्षांच्या एक व्यक्तीने अवयवदान केले. त्याच्या यकृताचे प्रत्यारोपण चव्हाण यांच्यावर तातडीने करण्यात आले. या अवयवदान प्रक्रियेत विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने महत्त्वाची भूमिका बजावली.

अवयवांचे वाटप करताना मेंदुमृत अवयवदाता ज्या रुग्णालयात आहे, तिथेच नोंदणी करण्यात आलेल्या रुग्णाला प्राधान्य दिले जाते. चव्हाण यांचे नाव सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नोंदवण्यात आले होते. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी त्यांना प्राधान्य दिले गेले. डॉ. बिपीन विभुते, डॉ. अपूर्व देशपांडे, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. दिनेश झिरपे, डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, डॉ. शीतल महाजनी आणि डॉ. किरण शिंदे यांच्यासह डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.

हेही वाचा >>> मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कोंडी; सलग सुट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

गेल्या महिन्याभरात सह्याद्री हॉस्पिटमध्ये झालेली ही दुसरी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. याआधी परभणीहून आलेल्या ४९ वर्षांच्या पुरुष रुग्णाची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्याला बऱ्याच काळापासून यकृताचा आजार होता. हॉस्पिटलमध्ये त्यांना अनुरूप ठरेल, असा दाता उपलब्ध झाल्याने हे प्रत्यारोपण शक्य झाले होते.

गेल्या महिनाभरात आमच्या वैद्यकीय पथकाने दोन यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला. अवयवदात्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे रुग्णांना नवजीवन मिळाले. – डॉ. बिपीन विभुते, सह्याद्री हॉस्पिटल

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organs of 47 year old brain dead man from pune save two lives pune print news stj 05 zws
Show comments