राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच झाला, मात्र यामध्ये अपक्ष आमदारांना संधी मिळाली नसल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात बच्चू कडूदेखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. याशिवाय, त्यांनी शिवसेनेतील आमदारांना केलेल्या बंडखोरीबाबतही मोठं विधान केलं आहे.
बच्चू कडू यांच्याबाबत बोलताना केसकर म्हणाले, “आमच्याकडे दोन अपक्ष मंत्री होते आणि दोघांपैकी एकालाच घेतलं असतं तर वेगळा संदेश जाऊ शकला असता. बच्चू कडू हे खरंतर ज्येष्ठ आहेत, ते एका पक्षाचे अध्यक्षदेखील आहेत. आमचे अत्यंत प्रिय असे आमदार आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसऱ्या टप्प्यात ठेवला जाणार आहे, तसं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे. माझे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत, मीदेखील त्यांची भेट घेईन. असं रागवण्यासारखं काही नाही, कारण मला स्वत:ला खात्री नव्हती की मीसुद्धा येऊ शकेन की नाही मंत्रिमंडळात, अशी परिस्थिती होती.”
…तरी हे एक बंजारा समाजाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं वचन होतं –
संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आल्यानंतर यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “हा आरोप कित्येक महिन्यांपूर्वी केला गेला होता, जवळजवळ वर्ष झालं. त्या दरम्यान जी चौकशी झाली, त्यात ते कुठेही दोषी आढळले नाहीत. त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आलेलं नाही. एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व ज्यावेळी ते करतात, त्यावेळी तुम्ही लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि अशा शेकडो लोकांनी जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनीदेखील आश्वासन दिलं होतं, की जर दोष त्यांच्यावर नाही आला तर आम्ही पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घेऊ. त्यांनी आपलं वचन पूर्ण केलेलं नसलं, तरी हे एक बंजारा समाजाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं वचन होतं. त्याची पूर्तता व्हायला पाहिजे. एकतर असं आही की कुठलाही दबाब हा पोलीस विभागावर येणार नाही. महिलांच्याबाबतीत आमचा दृष्टीकोन वेगळा आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भावना असते. त्यामुळे जर चित्रा वाघ म्हणत असतील की या प्रकरणात अधिक चौकशी झाली पाहिजे तर, ती चौकशीदेखील होईल.”
आम्ही जर एकत्र राहिलो तर आणखी कितीतरी लोक कमी होणार –
तसेच, “याशिवाय मी आपल्याला खात्री देतो की निपक्षपातीपणे ती चौकशी होईल. परंतु जर ते दोषीच नसतील तर त्यांना मंत्रिमंडळातून दूर ठेवावं, असं का म्हटलं जातय? हादेखील एक भाग आहे. जर ते दोषी आढळले असतील तर निश्चितपणे त्यांना घेतलंच नसतं. परंतु हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. विरोधकांकडे काही मुद्दे शिल्लक नाहीत. अगोदर काय म्हणायचे की आमच्यातील १५-२० लोक परत येणार, परंतु प्रत्यक्षात आम्ही जेव्हा परत झालो तेव्हा त्यांच्यात असलेल्यांपैकी एक कमी झाला आणि आम्ही जर एकत्र राहिलो तर आणखी कितीतरी लोक कमी होणार आहेत. कारण, लोकांची कामं होत नव्हती ना? परंतु उठाव करायला एक धैर्य लागतं, प्रसंगी ते धैर्य ते दाखवू शकले नाहीत, नाहीतर एक दोन वगळता सगळेच्या सगळे आमदार या उठावात सहभागी झाले असते, याची मला खात्री आहे.”