राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बोलीभाषेतून ते जनतेशी संवाद साधतात. तर, कार्यकर्त्यांनाही ते तशाच शब्दांत मार्गदर्शन करत असतात. आता तर थेट त्यांनी कार्यकर्त्यांना भर बैठकीत सुनावलं आहे. एवढंच नव्हे कार्यकर्त्यांच्या कानाखालीही वाजवेन अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. राष्ट्रावादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित केलेल्या बैठकीत ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.

“लोकांना पदे दिली आहेत. पदासाठी भांडायचं नाही. नाहीतर एकेकाच्या कानाखाली काढेन. बाकी काही नाही करायचं”, असं अजित पवार म्हणाले. “यातून तुमची बदनामी होत नाही. पवार साहेबांची बदनामी होते. हा कोणता फाजिलपणा सुरू आहे?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. तसंच, “पदाचा राजीनामा घेणार आणि टोकाचा वागेन फार. एकदा तुम्ही पदाधिकारी झाल्यावर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून लोक तुमच्याकडे बघतात”, असंही अजित पवार म्हणाले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याने आपली ताकद असलेल्या जागांची चाचपणी सर्व पक्षांकडून केली जातेय. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संवाद वाढले आहेत. म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने विविध मतदारसंघातील आपली ताकद ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पुण्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आमदार चेतन तुपे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेते उपस्थित होते.

Story img Loader