देशातील सध्याच्या दोलायमान परिस्थितीत देश वेगाने राजकीय विघटनाकडे जात आहे आणि राष्ट्रीय पक्षांचे सर्वसामान्यांशी असलेले नातेही तुटलेले आहे. अशा परिस्थितीत आगामी २०१४ च्या निवडणुकांमध्ये राज्याराज्यातील नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्वापेक्षा अधिक मजबूत झालेले दिसेल आणि त्यांचाच प्रभाव अधिक असेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केले.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयंतराव टिळक यांच्या स्मृती निमित्त आयोजित कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते. ‘आंबेडकरी चळवळीचे भवितव्य’ या विषयावर आंबेडकर यांनी व्याख्यान दिले. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली. ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल श्रीधर जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेतील यशस्वींना या वेळी आंबेडकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
देशातील सद्य:स्थिती पाहता राष्ट्रीय पक्षांचे नाते सर्वसामान्यांशी कुठेही जुळत नाही. सामान्यांशी जुळणारा कोणताही धागा या पक्षांमध्ये नाही. राष्ट्रीय पक्ष एका बाजूला आणि जनता एका बाजूला असे चित्र आहे. अशा परिस्थितीत राज्याराज्यांमधील नेतृत्वांनी त्यांचा पाया मजबूत केलेला आहे आणि राज्यांमधील हे नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्वापेक्षाही अधिक प्रभावीपणे प्रस्थापित झाल्याचे येत्या निवडणुकांमध्ये दिसेल, असे आंबेडकर यांनी या वेळी सांगितले. राजकीय प्रणालींचे तुकडे होण्याच्या अवस्थेकडे आज देश वेगाने जात आहे, असेही ते म्हणाले.
इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही राज्यस्तरीय नेतृत्व प्रस्थापित झालेले आहे. भाजप आणि शिवसेना एकीकडे, तर दोन्ही काँग्रेस एकीकडे असे चित्र आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या आघाडीलाही जागा आहे; पण ती ही जागा भरून काढण्यासाठी उभी राहील का, हा प्रश्न आहे, असेही मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.
आंबेडकरी चळवळीला भविष्याचा विचार करताना बाबासाहेबांनी मांडलेल्या अर्थशास्त्राचा पुन्हा विचार करावा लागेल. आर्थिक आणि अन्य प्रश्नांनाही सामोरे जाण्याची, त्यावर उपाय शोधण्याची आंबेडकरी चळवळीची गरज आहे. आंबेडकरी चळवळीकडून आता बाबासाहेबांच्या विचारांचे योग्य विश्लेषण करून त्याची नव्याने मांडणी सुरू झाली आहे. हा दबाव जसा वाढत जाईल तसा राजकीय विघटनाला आळा बसेल. मात्र, हा दबाव वाढला नाही, तर विघटनवाद वाढेल, असेही आंबेडकर म्हणाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे यांनी प्रास्ताविक आणि हणमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader